"आ चंद्र सूर्य नांदो, स्वातंत्र भारताचा…" स्वतंत्र भारत आणि त्यात चंद्र व सूर्याची साथ, हेच स्वप्न आपल्या सर्व स्वतंत्र सैनिकांनी पाहिले असेल. किती छान आहे हे स्वप्न !!! तसेच छान वाटलेलं जेव्हा लहानपणी आपल्या आईने आपल्याला चांदोमामा दाखवत जेवण भरवलं होतं ; आणि तसेच छान वाटते जेव्हा आज मी तो पंडरा चमकता गोल रात्रीच्या स्फटिक आभाळात पाहते. पण तुमच्या मनात विचार नाही का येत, की हा चमचमता गोळा नक्की आला कुठून? की हा आपल्या निवासी ग्रहासोबतच जन्माला आला? की हा दूर कुठल्याही दुसऱ्या सौरमंडलेतून आपल्या कडे आला? आणि असेच खूप सारे प्रश्न आहेत ज्यांची उत्तर सापडल्यामुळे आपण आज खूप प्रगती करू शकलो आहोत.
चंद्र, चाँद, मून, सेलेना आणि अशी करोडो भाषेतली करोडो नाव असलेला आपला चंद्राचे खरं नाव लुना आहे. लुना म्हणजे मून किंवा सोप्या भाषेतील चंद्र. आपल्या सौरमंडलेतील सर्वात मोठ्या चंद्रांच्या क्रमात लुना हा पाचव्या स्थानावर येतो. याचा जन्म ४.५-४ अब्ज वर्षा पूर्वी झाला. जेव्हा आपली धरतीला ४.५ अब्ज वर्षा पूर्वी जन्माला येऊन सूर्याच्या भवती लंबवर्तुळाकार (लांबीने मोठा असलेला गोल) कक्षेत परिक्रमा करत होती. तेव्हा थीया नामक एक लघुग्रह धरतीला येऊन धडकला. हा सिद्धांत वैज्ञानिकांनी १९७० साली मांडला व या सिद्धांताला जायंट इम्पैक्ट थ्योरी असे नाव पडले. या धडकेतून मागे राहिलेले थीया व धरतीचे तुकडे धरतीच्या भवती परिक्रमा करू लागले. हे तुकडे प्रचंड गरम होते, कारण त्यांच्यात धडकेतून निर्माण झालेली शक्ती होती. गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे म्हणजेच कोणत्याही गोष्टीला वजन असणाऱ्या गोष्टीशी जोडून ठेवणाऱ्या शक्तीमुळे, हे तुकडे एकत्रित झाले. या तुकड्यांनी एकत्र येऊन एक गोल बनवला, ज्याला आपण चंद्र असे म्हणतो.
नुकताच जन्मलेला चंद्र हा प्रचंड गरम व ज्वालामुखीने भरलेला होता. त्यावर अग्निग्जन्य द्रव्य म्हणजे मैग्माचे समुद्र होते. तो आतून खूप तापलेला होता. या गरम चंद्राचा रंग त्यावेळी ही राखाडी होता. आतून मात्र तो केशरी व लाल रंगाचा होता. हा लाल रंग त्याच्या आत असलेल्या द्रव्य म्हणजेच निकेल आणि लोह खूप तापल्यामुळे होता. त्याच्या पृष्ठभागावर सुरू असलेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भरपूर अग्निग्जन्य द्रव्य त्याच्या पृष्ठभागावर नदीतील पाण्यासारखे वाहत होते. या सोबतच उद्रेक होऊन काही ज्वालामुखी शांत. झाल्या. यात भर अंतरिक्ष मधून पडणाऱ्या लघुग्रहांनी घातली. आज जो चंद्र आपल्याला दिसतो तो या सर्व घडलेल्या गोष्टींचा एक मिळाव आहे. त्यावेळी चंद्रावर मातीच्या रुपात बेसाल्ट खडक, जो लोह व पांढरा चकचकीत धातू म्हणजे मॅग्नेशियम ने बनलेला आहे. तो बारीक कणांनी रुपात होता ; जो आजही असाच आहे.
आता जो चंद्र आपल्याला दिसतो तो प्रचंड थंड व शांत आहे. त्याचा गाभा अजुनही गरम आहे श. परंतु गाभ्याची त्रिज्या छोटी असल्यामुळे त्याची गरमी पृष्ठभागापर्यंत पोहचत नाही. चंद्राची त्रिज्या १७३४ किलोमिटर एवढी आहे. हे अंतर महाराष्ट्रातून झारखंड पर्यंत इतके आहे. त्याचे वजन ७.३४२ × १०^२२ किलो इतक आहे. धरती पासून चंद्र ३,८४,४०० किलोमीटर दूर आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने तीन दिवसात चंद्रावर पोहचता येते. आधी झालेल्या घटनांमुळे चंद्राच्या आत्ताचा पृष्ठभागाचे बरेचसे गुणधर्म दिसून येतात. मैग्माच्या समुद्रामुळे त्यावर मारिया म्हणजेच पठार तयार झाले आहेत. हे पठार आपल्याला धरती वरुन दिसणाऱ्या चंद्राच्या भागावर सापडतात. चंद्राची अर्धी जमीन ही या मारियानेच भरलेली आहे.अग्निग्जन्य द्रव्यामुळे चंद्राच्या काही भागावर पाण्याचे स्तंभासारखी जागा बनली आहे.
शांत झालेल्या ज्वालामुखीचे परिवर्तन डोंगरामध्ये झाले. चंद्रावर एक डोंगर असा पण आहे की तो मुळात एका खड्ड्यात आहे आणि त्यावर एक खड्डा आहे. बर, तुम्हाला माहिती आहे का की चंद्राची अर्धी जमीन मोठ्या मोठ्या खड्ड्यांनी भरलेली आहे?? आश्चर्य वाटतंय का? काही शांत झालेल्या ज्वालामुखी या खड्ड्यांमध्ये परिवर्तीत झाल्या. याच सोबत जे लघुग्रह चंद्रावर पडत होते त्यामुळे ही काही खड्डे तयार झाले. यांना क्रेटर असे नाव दिले गेले आहे. आपल्या सौरमंडलेमधला सर्वात मोठा क्रेटर म्हणजेच सर्वात मोठा खड्डा हा चंद्राच्या दक्षिणभागावर आहे, त्याला साऊथ पोल अटकेन क्रेटर नाव दिले गेले आहे.
चंद्राचे दिवसाचे तापमान १२०° अंश सेल्सिअस एवढे असते व रात्रीचे तापमान -१३०° अंश सेल्सिअस एवढे असते. हा फरक असण्याचे कारण आहे चंद्राचे वातावरण, चंद्राचे वातावरण पोकळी म्हणजे हवा नसलेले आहे. त्यामुळे तो उष्णता किंवा थंडी धरून ठेऊ शकत नसल्याने आपल्याला हा मोठा फरक दिसतो.
आपल्या ह्या चंद्राला आपण रोज पाहतो. पण त्याचा जमिनीला जवळून पाहणे खूप कमी लोकांना शक्य होते. आताच्या काळात हे खूप सोपे झाले आहे, परंतु आधीच्या काळात हे खूपच क्वचित असायचे. चंद्राच्या जमिनीला अतिशय जवळून पाहाण्याचे पहिले सौजन्य मिळाले ते गॅलीलियो गॅलेली यांना. १६०९ साली गॅलेली यांनी स्वतः दुर्बीण निर्माण करून चंद्राच्या जमिनीला पाहिले. त्या पाठोपाठ बऱ्याच जणांनी या भूमिकेस आपली नाव नोंदणी केली. तसेच चंद्राचा पहिला नकाशा थॉमस हैरियाट यांनी बनवला होता आणि चंद्रावर पहिले पाऊल नील आर्मस्ट्राँग आणि बझ अलडीन यांनी ठेवले होते.
"आणखी काय बोलू त्याच्या बद्दल तो माझी जीवन शक्ती आहे,
आणखी काय बोलू त्याच्या बद्दल तो माझी जीवन शक्ती आहे,
विसरून जाईन सर्व काही जो तो मिळेल मला,
तोच आनंद, तोच स्वप्न तोच भक्ती आहे…."
आपल्या या छोट्याशा विश्वातील छोट्याशा सौरमंडलेतील छोट्याशा धरतीवर तुम्हाला बऱ्याच गोष्टींवर प्रेम करणारी माणसं मिळतील आणि समजा त्यात चंद्रावर प्रेम करणारा आढळला तर त्याला सिलेनौफाइल असे म्हणतात. असे म्हटले जाते की तंत्रज्ञानाने माणसाला जवळ आणले आहे. मी म्हणेन तंत्रज्ञानाने पूर्ण विश्वाला जवळ आणले आहे आणि त्याचमुळे माणूस परत एकदा चंद्रावर जाणार आहे. आता हे कधी होणार? तर २०२४ मध्ये! आरतीमिस नावाच्या मोहीमे अंतर्गत दूसरा माणूस व पहिली महिला हे चंद्रावर आपले पाऊलखुणा बसवणार आहेत. या आधी १२ लोकांनी हे काम यशस्वीपणे निभावले आहे.
पुढे असा काळ येईल की आपल्याला याच चंद्रावर राहावे लागेल. पण ते जीवन धरतीवरच्या जीवनापेक्षा फार वेगळे असेल. ते चंद्राचे सर्व गुण-अवगुण लक्षात घेऊन वसलेले जीवन असेल. तर यासाठी चंद्राच्या सर्व गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. तसेच धरतीची काळजी घेणे देखील आवश्यक आहे. म्हणून आजपासून धरतीची काळजी घेणे व चंद्राबद्दल जाणून घेणे हे निर्धार मनी ठेऊन आपण त्या दिशेने वाटचाल करूया.
Comments