चाफ्याची फुले न आवडणारा निराळाच! आपल्याकडे चाफा म्हणून जी फुले संबोधतो त्यात सोनाचाफ्याबरोबर हिरवा चाफा , देवचाफा, भुईचाफा, कवठी चाफा, नाग चाफा ही वनस्पती शास्त्रीय दृष्ट्या वेगवेगळी असली तरी एकत्रितपणे विचारात घेतली जातात. त्यातील सोनाचाफ्याचा साजचं अलग. हे चाफ्याचे सर्व प्रकार कवि माधवांनी सुरेख शब्दात एकत्र गुंफले आहेत
हंसे उपवनी अर्धोन्मिलीत सुवर्ण चंपक कळी
पाहुनी तुळशीवर चिमुकली हालत निज सावली
विविध सुवासी हिरवा चाफा चाळेत करी मानस
मंद सुगंध पसरतो भूईचाफा राजस
गडा गडावर निवास जेथे मायभवानी करी
राही उधळीत फुले तेथे भुईचाफा राजस
घालून रुंजी भ्रमंती भ्रृंगत्या नागचंपकावरी
कमळ, पळस, पारिजात याबरोबरच चाफ्याच्या फुलांनी सर्व कवि मंडळींना वेड लावले आहे; प्राचीन साहित्यात मात्र कोठे चाफ्याचे उल्लेख आढळत नाहीत. जाई- जुई- सायली स्त्रीलिंगी तर तेरडा- धोतरा- चाफा- गुलाब ही पुल्लिंगी फुले.मोगरा हे नाव पुल्लिंगी वाटले तरी ज्ञानेश्वर माऊली मात्र मोगरी या नावाने संबोधतात.
लौकिकार्थाने कोणतेही पान- फूल आजरामार करू शकत नाही, पण कवी मंडळी मात्र आपल्या लेखणीद्वारे ही किमया साध्य करून दाखविली. चाफ्याची फुले साहित्यातील तीन व्यक्तीमुळे मुख्यत्वे मनात रुजली- कविराज भूषण, कवी बी व कवियत्री पद्मा गोळे!
कविराज भूषण हे कनोजी ब्राम्हण, शिवरायांचे भाट. त्यांनी शिवस्तुती पर शिवबावनी व शिवराज भूषण हे शिव महिमा सांगणारे ग्रंथ लिहिले. शिवरायांना तो "सिरसिवा" या नावाने संबोधत असे, पण शिवरायांना मात्र हे स्तुतीकाव्य ऐकण्यास सवड मिळत नसे!
कविराजांना एकदा साक्षात शहेनशहांनी बोलावून स्वत:वर स्तुती काव्य करण्यास फर्मावले.तोंड देणारे साक्षात कविराज होते म्हणून ठीक,नाहीतर हा मोठा बाका प्रसंग होता.
औरंगजेबाला त्यांनी भ्रमराची उपमा दिली,तर मंडलिक राजांना फुलांची. काश्मीरचा राजा गुलाब ,माळव्याचा जास्वंद, तर बंगालचा कमळ.-सहाजिकच प्रश्न आला-सिवा कौन ?
थोडाही विलंब न करता कविराज उत्तरले , सोनचाफा!.. समझने वाले समझ गये!सोनचाफ्याच्या उग्र वासाने त्याला कधीही भुंगा लागत नाही .यावर बाळ कोल्हटकरांचे काव्य-
रंग हा भृंग सर्वत्र बैसे ,बसेना जिजापुत्र चाफ्यावरी
रविंद्रनाथांच्या ओळी तर प्रसिद्ध आहेत ....
Where the golden glowing champak buds are flowering ,there are fireflies flying , scattering the clouds of dreams.
गर्दसभोती रानसाजणी मी तर चाफेकळी,
काय हसले सांग शोधिसी या यमुनेच्या जळी!
हे तर कवी बी चे काव्य प्रसिद्ध आहे.
चाफा बोलेना , चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना - प्रेयसी प्रियकराला चाफ्याच्या रुपात पाहते आणि त्याला खुलवायचे किती प्रयत्न करते हे या सुंदर काव्यात मांडले आहे. एक विचारधारा हे आध्यात्मिक काव्य मानते.
चाफा उत्तराची फुलतो, जसा जसा फुलतो तसा तसा आसमंत सुगंधाने भरून जातो, आसमंतही मावेनासा होतो - बाकी बा.ब.बोरकरांच्या शब्दात -
बोलताना लाटांपरी नको मोतियाने फुटू
नको चाफ्याच्या श्वासांनी संगे चालत लगटू
तर कुसुमाग्रज लिहितात-
तू दिलेल्या चाफ्याच्या फुलात तुला पाहतो आहे,
अनुभव घेत आहे आणि माझ्याच अस्तित्वाला शोधत आहे
- उषेच्या सत्वात आकरालेले हे गंध मार्दव
ज्ञानेश्वर माऊलींच्या सारखेही व्यक्तिमत्व चाफ्याचा मोह टाळू शकले नाही, वदतात - हा सुवर्ण चंपकाचा कळा की कनकाचा पुतळा ! उपमान्य म्हणून चाफ्याचा उपयोग केला आहे. नाकाला चाफेकळी ची उपमा दिलेली आपण सर्वांना माहीत आहे, पण एका अनामिका चे काव्य -
नयन मनोहर पाहुन नीट फुलली कमळे निळी
तीक्ष्ण नासिका जणू शोभे ग सुवर्ण चंपक कळी
तर वसंत बापट यांचे शब्द -
रंगाने तू गव्हाळ त्यातुनी अंगावरती सोनसळा
टवटवीत घवघवीत मुखडा अंगावरती सोनकळा
दुसऱ्या एका कवितेत म्हणतात -
तसे पहायला तुला मला ग अजूनी दवबिंदू थरथरतो
अर्ध्यामुर्ध्या कानगुजस्तव अजूनी ताठर चंपक फुलतो
इंदिरा संत तर वेगळ्याच भावविश्वात घेऊन जातात -
दोन चाफ्याच्या पाकळ्या किती लोभस चालल्या
हिऱ्या मोत्याच्या दंवाने किती लोभस साजल्या
सासरी तर चाफा बहरलेला, पण माहेरचा चाफा कसा विसरता येईल
-फुलांमध्ये फूल चाफ्याचं लाडीक
- सुगंधाच्या झुळकेवर नेत माहेरी आणिक वारा-कान्त वेगळ्याच आठवणी जागवतात -
रानी चाफा फुली आला तशी जेव्हा हसतेस,
क्षण गळे तो फुलांचा नसे चाहूल फांदीला
सोनचाफ्याची सांगता कवयित्री पद्मा गोळ्यांची शब्द वापरून-
चाफ्याच्या झाडा , चाफ्याच्या झाडा, नको नरे डोळ्यात पाणी आणूस ,
ओळखीच्या सुरात , ओळखीच्या तालात हृदयाची गाणी नको ना म्हणू.
कवठी चाफा - दोन प्रकार पांढरा संध्याकाळी फुलणारा तर पिवळा सूर्योदयाबरोबर - अतिसुगंधी - मात्र अल्पकाळ टिकणारे सुगंध '
नागचाफा - त्याचे पराग म्हणजे नागकेशर , मसाल्यातील एक घटक अनेक औषधी उपयोग , गंधक विरहीत मोठा वृक्ष असतो , फुलाला एग फ्लॉवर असेही म्हणतात . उकडलेले अंडे आडवे कापल्यावर दिसते तसे फुल दिसते . मध्ये पिवळे गर्द गोलाकारात पराग तर भोवताली पांढऱ्याशुभ्र पाकळ्यांचे मंडळ.
भुईचाफा ही कंदवर्गीय वनस्पती. ग्रीष्म ऋतूच्या शेवटच्या पर्वात जमिनीमधून एक दांडी वर येते, पूर्ण ३-४ दिवसात एक फूल उमलते. गुलाबी छटा अति सुगंधी. फूल सुकल्यावर पाने येतात. पुढील वर्षासाठी कदात अन्नसंचय करून लुप्त होतात.
सुगंधाने सोनचाफ्याची जवळीक म्हणून हिरवा चाफा या कुटुंबात सामील केला गेला. हे वनस्पती शास्त्रीय दृष्ट्या रामफळ, सीताफळ या कुळातले . फूल सहज नजरेस पडत नाही, देखणेपण नाही, पण सुगंधामुळे कवि मंडळींना प्रिय-
लपवलास तू हिरवा चाफा सुगंध त्याचा लपेल का?
प्रीत लपवुनी लपेल का?
हे सुप्रसिद्ध गीत डॉ. शरदिनी डहाणूकरांनी किती यथायोग्य वर्णन केले आहे पहा. फूल झाडावर असताना पानाचा घुंगट सुद्धा वर करणार नाहीत, पण गंध मात्र या शालीनतेच्या बुरख्याआड दडवलेली मादकता दाखवून जातो.
उखाण्यात सुद्धा हिरवा चाफा आहे.कल्पना कविवर्य महानोर.
हिरव्या आंब्या चाफ्याचा चाफ्याचा नाव घेते मी नाव घेते
चांद मोत्याचा भांग मोत्याचा भाळी चांदणी माझ्या रायाचा
उरला तो आता देव चाफा - विदेशी वृक्ष - अनेकरंगी फुले, मंद सुवास. खूप चाफा, मढी चाफा , क्षीर चंपक या नावाने पण ओळखला जातो. यावर लोककथा-
सुमती व दुर्मती या राण्या असलेला एक राजा, निपुत्रिक असतो. पुत्रप्राप्तीसाठी अनेक व्रत उपाय चालू असतात. परमेश्वर कृपेने सुमतीला दिवस जाऊन पुढे पुत्रप्राप्ती होते. दुर्मतीचा मत्सर जागृत होतो, ते मूल ती जंगलात पुरते व त्याच्या जागी दगड ठेवते.असे सात वेळा घडते. साहजिक राजाला चीड येते,तो राणीची रवानगी जंगलात करतो.जिथे ही बालके पुरली असतात. तेथेच सुमती झोपडी बांधून राहू लागते.जेथे बाळे पुरली असतात,त्यातून सोन चाफ्याची झाडे उगवतात. राणी रोज सकाळी देव पूजेसाठी फुले गोळा करण्यास जात असे तेव्हा ही वृक्षरुपी बाळे आपल्या फांद्या वाकवून मातेच्या परडीत पुष्पहार उतरत असत.
राजाला ही बातमी समजते - चौकशी अंती सर्व प्रकार त्यांच्या लक्षात येतो. सुमतीला तो सन्मानाने परत आणतो. मोठ्या मनाने ती दुर्मति क्षमा करते.
कवि मंडळींना हे फूल प्रिय , काही बारमाही फुले आहेत तर काहींना वसंत ऋतूत बहर येतो, पाने झडून झाड फुलायला लागते.
शिरीष पै वर्णन करतात-
थंडी वाढता थोडी थोडी कमी झाली
शुभ्र चाफ्याच्या झाडाला कळी एक एक आली
एका फांदीच्या टोकाला गुच्छ आला बहरून
कधी कळी झाले फूल नाही आलेच कळून
खरच या ऋतूत कितीतरी कळ्यांची फुले होतात! किती साम्य आणि किती सार्थ शब्दात घातलेली सांगड !
बाकी बाबांचा चाफा -
माझ्या गोव्याच्या भूमीत चाफा पानांविना फुले
भोळा भाबडा शालीन भाव शब्दाविना कळले
वा. रा. कांतांच विश्लेषण -
पांढरा सन्यस्थ चाफा गाळीत पाने उभा
जीवनी निष्पर्ण त्याच्या फूलपण आंदोलते.
वसंत बापटांची वेगळी तऱ्हा-
म्हाताऱ्या पडल्या पडल्या सेनापती परी
गत स्मृतींचे बिल्ले लावून दिमाख दाखवा पांढरा चाफा
शीर्षक साठी वसंत बापटांच्या ओळींपैकी -
भूळच्या आळी नागांना ही मोहवी असा सोनचाफा , आलेल्या पृथ्वीच्या नव्हाळीच्या वाफा सांगता रवींद्रनाथांच्या शब्दांच्या आधार
आता निरोपाचा सुर धर कण्हेरी चटका
अखेरच्या बहराने दुगाण्या भरा.
Comments