मराठी भाषेत कधी भूशास्त्र विषयातील माहितीपर लेख वाचायला मिळाला तर ती एखादी दुर्लभ घटनाच समजावी. आधीच या विषयाची प्रचिती कमी आणि त्यातही मातृभाषेत लेखन करणारे मोजकेच लोक असतील. हीच संधी साधून सर्वसामान्यांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न केला आहे.
भुशास्त्र हा एक कुतूहल जागं करणारा विषय आहे. यामध्ये विविध खनिजे, खडक, रत्ने, जीवाष्म, भूजल, भूरूपे यांसारख्या अनेक गोष्टींचा अभ्यास केला जातो. या गोष्टींचा उपयोग खाणकाम, पेट्रोलियम, अभियांत्रिकी, संशोधन अशा अनेक क्षेत्रात केला जात आहे. त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला असणाऱ्या असंख्य गोष्टींमागेदेखील भूशास्त्र दडलंय. आपल्या सृष्टीत काही अद्वितीय संरचना आहेत ज्या पूर्णपणे नैसर्गिकरित्या तयार झाल्या आहेत. या संरचना आपल्याला पृथ्वीच्या हजारो-लाखो वर्षांपूर्वीच्या इतिहासाची साक्ष देतात. अशाच काही रोचक गोष्टींबद्दलची माहिती आज इथे देत आहे. यात जाणीवपूर्वक सर्वांना माहित असलेली आणि जाण्यास सोयीस्कर अशी ठिकाणे निवडली आहेत.
१) लोणार सरोवर :
महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यापासून ९३ किलोमीटर अंतरावर दक्षिण पूर्व दिशेला लोणार हे गाव वसलेलं आहे आणि इथेच जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे सरोवर - लोणार सरोवर स्थित आहे. जवळपास ५०,००० वर्षांपूर्वी एका उल्कापातामुळे (meteorite) हे आघाती विवर (impact crater) तयार झाले आहे. सरोवराच्या सभोवताली अशी काही विशिष्ट खनिजे सापडली आहेत जी फक्त एखादी वेगवान वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागावर जोरात आदळल्यामुळेच तयार होऊ शकतात. याच पुराव्यांमुळे या सरोवराची निर्मिती उल्केमुळेच झाली असून हे एक आघाती विवर असल्याचे सिद्ध झाले आहे. हे बेसाल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे. या सरोवराचा व्यास १.२ किलोमीटर असून याची खोली १३७ मीटर आहे.
काही महिन्यांपूर्वीच या सरोवरातील पाणी गुलाबी झाल्याचे निदर्शनास आले होते. हॅलोअरकिया या खाऱ्या पाण्यातील जिवाणूंमुळे सरोवरातील पाणी गुलाबी झाल्याचा शोध वैज्ञानिकांनी लावला होता.
या आघाती विवराचे 'राष्ट्रीय भू -वारसा स्मारक' (National Geoheritage Monument) म्हणून संवर्धन करण्यात येत आहे. तसेच हे सरोवर वन्यजीव अभयारण्य घोषित केले गेले आहे. युनेस्को (UNESCO) अंतर्गत काही पाणथळ जागांना 'रामसर स्थळे' असा दर्जा दिला जातो. नोव्हेंबर २०२० मध्ये लोणार सरोवराला हा विशेष दर्जा प्राप्त झाल्यामुळे आता या जागेला आंतरराष्ट्रीय महत्व मिळाले आहे. यामुळे नानाविध प्राणी आणि पक्ष्यांचे संवर्धन करण्यास मदत होईल.
२) रांजण-खळगे, निघोज :
पुणे-नगर महामार्गावरून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर वसलेल्या निघोज गावातील कुकडी नदीपात्रात अनेक लहान मोठे रांजण-खळगे तयार झाले आहेत. नदीच्या पाण्यासोबत वाहून आलेले असंख्य दगड-गोटे आणि नदी पात्रातील मूळ खडक यांच्यात घर्षण (friction) निर्माण होते. पाण्याचा प्रचंड वेग आणि आर्तव प्रवाह (eddy currents) म्हणजेच पाण्याची भवऱ्यासारखी गती यांमुळे घर्षण निर्माण होऊन खडकाच्या मृदू भागाची झीज होते आणि या रांजण-खळग्यांची निर्मिती होते. हजारो वर्षे चालणाऱ्या या प्रक्रियेमुळे रांजण-खळगे कालानुरूप मोठे होतात. हे रांजण-खळगे गावकऱ्यांमध्ये कुंड या नावाने प्रसिद्ध आहेत. या ठिकाणाची नोंद आशिया खंडातील सर्वात मोठे रांजण खळगे म्हणून गिनेस बुक मध्ये झाली आहे.
३) नैसर्गिक कमान, तिरुमला :
ही अद्भुत संरचना सुप्रसिद्ध तिरुपती मंदिरापासून उत्तर दिशेला अवघ्या एक किलोमीटर अंतरावर स्थित आहे. याला स्थानिक भाषेत 'शिलाथोरणम' असे म्हणतात. येथे शिळा म्हणजे खडक आणि थोरणम म्हणजे दोन उभ्या स्तंभांना जोडणारी माळ असा साधारण अर्थ लावता येतो. हवा आणि पाणी यांच्या हजारो-लाखो वर्षांच्या अपक्षय (weathering) आणि अपक्षरण (erosion) या प्रक्रियेमुळे ही कमान तयार झाली आहे. खडकाच्या एखाद्या कमकुवत भागावर वर्षानुवर्षे ही प्रक्रिया कार्यरत असल्यामुळे ही संरचना उदयास आली आहे. हि संरचना १५ कोटी वर्षांपूर्वी क्वार्टझाइट नावाच्या खडकात तयार झाली आहे. ही नैसर्गिक कमान ३ मीटर उंच आणि ८ मीटर लांब आहे. या स्थळास 'राष्ट्रीय भू -वारसा स्मारक' (National Geoheritage Monument) हा दर्जा देण्यात आला आहे.
भारतात अशी अनेक स्थळे आहेत जी भूशास्त्रीय क्रियांमुळे निर्माण झाली आहेत आणि ज्यांचे कितीही वर्णन केले तरी कमी पडेल. या स्थळांबद्दल वाचून तुमच्यातील कुतूहल जागे झाले असेल तर या स्थळांना नक्की भेट द्याआणि निसर्गाच्या जादूची मजा घ्या, पण यावेळी त्यामागची शास्त्रे जाणून!
Kommentare