सध्या भारतात मधमाशीला राष्ट्रीय कीटकाच्या दर्जा द्यावा ही मागणी जोर धरत आहे आणि ती रास्तपण आहेच. आपले नशीब इतके वाईट की त्याच वेळी पाली-झुरळ , मधमाश्या मारून मिळतील अशा जाहिराती बघायला मिळतात यावर काही कारवाई होत नाही. अशातच दोन महिन्यांपूर्वी बातमी वाचली की गेल्या वर्षी जास्त झालेल्या पावसामुळे मधमाश्यांची संख्या घटली. परागीभवन कमी झाल्याने शेवग्याचे उत्पन्न ५०%च झाले.
मधमाश्या पुष्परस गोळा करून मध तयार करतात, त्या वेळी परागीभवन होते. धान्य, फळे यांचे उत्पादन होते . वैद्यकिय उपचारात मधमाश्यांचा "डंख" वापरला जातो . मधमाश्याचे मेण औषध निर्मिती व औद्योगिक क्षेत्रात वापरले जाते. आपली चप्पल दुरुस्त करताना जो दोरा वापरला जातो त्याला ही मेण लावले जाते ज्या योगे तो कुजत नाही, त्याची ताकद वाढते. अनेक पक्ष्यांचे भक्ष मधमाश्या आहेत. ही सर्व माहिती आपणा सर्वांना आहेच.
निरीक्षणांनंतर शास्त्रज्ञांना नवीनच माहिती जी अतिशय रंजक आहे अशी मिळाली आहे. मधमाश्या व इतर भ्रमर यांची प्रथिनांची गरज पराग खाऊन भागवली जाते, पण जेव्हा बराच काळ फुले नसतील तर काय घडत असेल? मानव डाळी, द्विदल धान्य यांचं उत्पादन वाढवतो, पोल्ट्रीफार्म वाढवतो- हे भ्रमर काय करत असतील!
निरीक्षणात असे लक्षात आले की स्थानिक फुलझाडे ज्यांपासून मिळणारा पुष्परस आहे त्यांच्या पानाच्या विशिष्ठ जागी अर्ध चंद्रकृती भोकं सापडली, पण कोणताही कीटक दिसला नाही. सतत व प्रदीर्घ निरीक्षणावरून असे लक्षात आले की हे काम मधमाशा करत आहेत. आपल्या जबड्याचा वापर करून ही भोक पाडायचा उद्योग चालू आहे. आपण सॅलडस् खातो तशा या माशा खातात असे वाटून त्याचे विच्छेदन केले. त्यांच्या पोटात तर या पानांचा अंश सापडलाच नाही! पण नंतर असे लक्षात आले की ही जी बाधित झाडे आहेत ती इतर बांधवांच्या बऱ्याच अगोदर, ३० दिवस अगोदर फुलत आहेत! अशा रितीने त्या आपली प्रथिनांची गरज पूर्ण करत आहेत.
हे का घडत असाव ? एक तर मधमाश्यांच्या लाळेत अशी संजिवक द्रव्ये असावीत ज्या योगे वेळे अगोदर पुष्पधारणा होण्यास चालना मिळत असवी. दुसरे म्हणजे प्रत्येक सजीव आपल्या वंशवृद्धी चा प्रयत्न करत असतो. तसे घडत असावे. आपल्या अस्तित्वाला धोका आहे असे वाटून बिज धारणा लवकर होणे गरजेचे आहे व त्यासाठी लवकर फुलणे हा झाडाने केलेला प्रयत्न असावा!
या गोष्टीचे वेगळेच महत्त्व शास्त्रज्ञांना वाटत आहे. वैश्व़िक तापमान वाढीमुळे अनेक प्रजाती धोक्यात आल्या आहेत. मधमाशांच्या या किमयेमुळे कमी वेळात बीजधारणा होण्यास मदत होऊन या प्रजाती टिकून रहाण्यास मदतच होईल! डॉ. मार्क मेश्चेर , झुरिच येथे अभ्यास करत आहेत . मजा म्हणजे मधमाश्या ज्या प्रकारे झाडाची पाने कातरत असत असे प्रयोग प्रयोगशाळेत करून पाहिले, पण झाडे बहरली नाहीत! काही झाडे अशा प्रकारे उत्क्रांत झाली असावीत की जी मधमाशांची गरज ओळखून लवकर फुलत असावीत.
एकंदरच आपण कीटकसृष्टीकडे बघायचा दृष्टिकोन बदलायला पाहिजे. प्रथम सर्वांना ही जाणीव करून दिली पाहिजे की आपले अस्तित्वच या सृष्टीवर अवलंबून आहे. अनेक फुलपाखरे संग्रहक पकडतात. काही प्रजाती तर नामशेष झाल्या, परिणामी ज्या वनस्पती त्या विशिष्ट फुलपाखरांवर अवलंबून होत्या त्याही कालांतराने नष्ट झाल्या.
मधमाशी संवर्धन व त्यांचा उपयोग कसा करून घ्यायचा हे अमेरिकेतील मधमाशी पालन करणाऱ्यांकडून शिकले पाहिजे. अमेरिकेत शेती, फळबागा प्रचंड मोठ्या! कितीही आधुनिकीकरण केले असले तरीही परागीभवनासाठी किटकांवरच अवलंबून राहावे लागते. विशेषतः उत्तर अमेरिकेत वर्षातील सहा महिन्यापेक्षा जास्त काळ उणे ३०°से. पर्यंत तापमान घसरते. तेव्हा मधमाशा कशा जगवायच्या! आपल्याकडे जसे मेंढपाळ आहेत तसे तेथे मधुमक्षिका पालक आहेत. ते तापमान संतुलित केलेल्या मोठ्या गाड्यांमधून मधमाशांच्या पेट्या घेऊन फिरत असतात, वसंत ऋतूच्या सुरुवातीलाच ह्या पेट्या घेऊन शेतकऱ्यांकडे जातात,आपल्याकडे जशा मेंढ्या शेतात बसवतात त्याप्रमाणे शेतात परागीभवनाचा हंगाम संपेपर्यंत मधमाशांच्या पेट्या ठेवतात, त्याबद्दल त्यांना भरघोस मोबदला मिळतो. मधापासून मिळणारे उत्पन्न वेगळेच. हंगाम संपला की पेट्या गाडीत भरून दुसऱ्या मुलखात जातात.
उत्तर अमेरिकेत बदामाचे मोठे उत्पादन होते, या उत्पादनाचा ७५% भाग मधमाशांवर अवलंबून आहे. मधमाशांची अशी "वसाहत" एका शेतात ४ ते ६ आठवडे ठेवली जाते, एका वसाहतीत प्रत्येकी ४ पेट्या, प्रत्येक पेटीत सुमारे ५०,००० मधमाश्या असतात. प्रत्येक वसाहतीमागे २०० डॉलर्स उत्पन्न मधमाशी पालनकर्त्याला मिळते. जर्मनीमध्येही या प्रकारचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालू झाला आहे. आपणास आश्र्चर्य वाटेल, मधमाशी एकेवेळी ६ किलोमीटर पर्यंत उडू शकते.
Comments