सात वर्षांपूर्वी पहिले घर पाडून नवीन बांधले तेव्हा पक्ष्यांसाठी घरटी-पेट्या ठेवल्या. दर वर्षी ग्रे टीट, साळुंकी, मॅगपाय रॉबिन संसार थाटून जात. या वर्षी वेगळीच गोष्ट घडली. फेब्रुवारी ते जून दरम्यान रॉबिन च्या चार जोड्या, एकापाठोपाठ एक अशा एकाच घरट्यात संसार मांडून गेल्या. दर महिन्याने छोटी पिल्ले बागेत दिसत.
सुमारे २५ वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. बंगल्यासमोर चार मोठी पामची झाडे आहेत, दोघांवर तरी नक्की रॉबिनसंसार मांडत असत. बंगल्याच्या मागे आंबा, नारळाची झाडे आहेत, त्या झाडांच्या खाली बराच वाळलेला पाला पाचोळा पसरून ठेवत असू, त्याला मल्चिंग असे म्हणतात. दोन उद्देश- कुजून त्याचे खात होते व उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन होते ते कमी होऊन पाणी झाडाला मिळते. त्या पाचोळ्यात भरपूर झुरळे होत असत. अर्थात त्याचा आम्हाला काहीच त्रास नव्हता. स्वयंपाक घरात जी भांडी धुतली जात त्यांचे पाणी मोठ्या पातेल्यात गोळा करून ते झाडांखाली पाचोळ्यावर फेकत असू. पाणी फेकल्यावर झुरळे तर उडत असत - बुलबुल, चिमण्या, रॉबिन यांना ती मेजवानीच असे. भराभर पक्षी येत.
विणीच्या दिवसात पामच्या झावळ्यांच्या बुडात रॉबिन संसार थाटत असत, एका वेळी २ ते ३ पिल्ले. त्यांची पूर्ण वाढ ३ ते ४ आठवड्यात होते - अर्थात त्यांची प्रचंड भूक भागवण्यासाठी पालकांच्या एकसारख्या फेऱ्या चालू असत - ते मी पाचोळ्यावर पाणी टाकण्याची वाट बघत असत. बंगल्याच्या पुढच्या बाजूला घरटे होते तर ही झाडे परसदारी होती.
मी दुपारी १च्या सुमाराला गाडीवरून घरी येत असे. हे पक्षी मला ओळखू लागले होते. कारण कपडे जरी वेगवेगळ्या रंगाचे घातले तरीही मला पाहिल्यावर आई बाप मागच्या बाजूला जाऊन जवळच्या फांदीवर बसत, मी पाणी फेकले की झुरळे उडत असत. त्यावर त्यांच्या उड्या पडत असत. काही वेळाने परत फांदीवर किलबिलाट सुरू होई- अर्थात माझे लक्ष वेधण्यासाठी पुढेपुढे तर मी बागेत जेथे जाईन तेथे माझ्यामागे येत असत. जमिनीवर खुरपत असताना अगदी ३-४ फुटांवर येऊन बसत, पिल्ले उडून गेल्यावर सुध्दा त्यांचा कायम स्वरुपी मुक्काम माझ्या बागेतच असे.
मा. मारुती चित्तमपल्लींशी माझे अनेक वर्षांचे संबंध. त्यांच्या पहिल्या पुस्तकातील पक्षांचे फोटो मी काढलेलेच आहेत, त्यांनासुद्धा हे खर वाटेना. पुण्यात आल्यावर हा प्रकार पाहण्यास पूर्ण दिवस तेती माझ्याकडे थांबले होते!
(त्याकाळी रोज दुपारी मी ड्रेनेजची झाकण मी अर्धी उघडी ठेवत असे. आत भरपूर मोठी झुरळे असत-अनेक पक्षी सूर मारून झुरळे पकडत असत)
Comments