माणसं, प्राणी, पक्षी आपले भाई-बंध, आप्त ओळखतात. कारण त्यांना मज्जासंस्था असते. प्रत्येक पिढीगणीक अनुभवांमधून ती समृध्द होत असते. आपल्या निकटवर्ती आप्ताला, जोडीदाराला साहजिकच झुकते माप दिले जाते. प्राधान्याने त्या व्यक्तीची कामे केली जातात. एका कॅनडामधील जीवशास्त्रज्ञाने सुमारे १२ वर्षांपूर्वी पहिल्यांदा कल्पना मांडली. आपले जातभाई आप्त वनस्पती ओळखत असतील का? जगण्यासाठी आपल्यांची दीर्घकाळ काळजी जेथे घ्यावी लागते, तसेच जेथे आपले भक्ष स्वतः पकडून आपली भूक भागवायला लागते तेथे समूहजीवन वा कुटुंबसंस्था अस्तित्वात आली. जसजसा प्राणी उत्क्रांत होत गेला तसतशी बुद्धीत भर पडली. आपली अपत्ये/भाईबंध ज्यांची जनुकं एकसारखी आहेत त्यांचा कडचा ओढा वाढला. हेच वनस्पती उत्क्रांत होताना होत असेल का?
तर त्याचे उत्तर 'होय' असे संशोधनांती मिळाले.
लौकिकार्थाने वनस्पतींना मज्जा-संस्था नसते. जरी दिवस रात्र वतावरणातले बदल कळत असले तरीही,पण संशोधन व निरीक्षणानंतर असे आढळून आले की, समाईक जनुकं जेथे जेथे आहेत, त्या ठिकाणी जास्त ओढा, आकर्षण आहे. समूहात लावलेल्या वनस्पती एकमेकांचा विचार करून वाढतात. जास्त उत्पादन करतात. सुसान डुडके(Susan Dudky) यांचा झाडांच्या उत्क्रांतीवर बराच अभ्यास आहे. कॅनडामध्ये हॅमिल्टन येथील मॅक मास्टर युनिव्हर्सिटीत त्या शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा असे निदर्शनास आले की, जी eka प्रजातीची, ज्यांची जनुकं सारखी आहेत ती समूहात लावली तर वाढताना एकमेकांना प्राधान्य देतात, विचार करतात. एकमेकांना मारक होणार नाही अशा प्रकारे मूळं पसरवतात, एकमेकांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळावा अशा रीतीने पाने, फांद्या वाढवतात. इथे भाऊबंधकी नसून भाईचारा असतो. अगदी वाळवीपासून माणसांपर्यंत सगळ्यांना 'आपला' कोण ते कळते
नॉर्थ अमेरिकेतील सायकोरेट एक प्रकारची निवडुंग वर्गीय वनस्पती घेऊन काही प्रयोग केले गेले. ही वनस्पती वेगवेगळ्या कुंड्यांमधून सजातीय व इतर वनस्पतींबरोबर लावली. जेथे स्वजातीयांबरोबर वाढली तेथे त्यांची मुळ एकमेकांना पूरक रीतीने वाढली. सगळ्यांना अन्न, पाणी मिळेल अशा हिशोबाने, त्रयस्थांबरोबर फक्त आपलाच विचार करून वेडीवाकडी वाढली
थायलंमध्ये ऊतिसंवर्धनाने(टिश्यू कल्चर) तयार केलेली ऑर्किड्सची छोटी रोपे हवा बंद बाटलीत मिळतात. ती येथे आणल्यावर वेगळी करून नीट वाढावी या उद्देशाने वाढवायचा प्रयत्न केला. बहुतेक मेली. एकत्र जी वाढली ती बरीच जगली.
शोषणास उपयोगी बुरशी मुळांभोवती जास्त प्रमाणात होती. तिलाही झाडांकडून भरपूर शर्करा मिळत होती. कीटक नाशक रसायनांची जास्त प्रमाणात पानांमध्ये निर्मिती होत होती
आपण नष्टप्राय झालेली जंगले पुनर्जिवित करण्याचा प्रयत्न करीत आहोत, तेथे या ज्ञानाचा उपयोग करून घेता येईल का?
२००७ पासून बरेच शास्त्रज्ञ यावर अभ्यास करू लागले. ल्युसेनी विद्यापीठामध्ये मॉरकंडिया स्पॅनिश या वनस्पतीच्या ७७० बिया स्वजातीय व इतर सहा प्रकारच्या वनस्पतींबरोबर लावल्या. जेथे स्वजातीयांबरोबर लावल्या, तेथे सर्वत्र झुडपे छान फोफावली. जास्त कीटक, परागीभवनास उपयुक्त असे आकर्षित झाले. भरपूर फुले व बिया आली. २०१८ साली ' नेचर कम्युनिकेशन' या नियतकालिकात हे संशोधन सर्वप्रथम सर्वांसमोर मांडले. माद्रिद येथील किंग ज्युअन कार्लो विद्यापीठत टेरिसेस या वनस्पतीवर बरेच प्रयोग केले गेले. प्रत्येक झाडाने पुढील पिढी जास्त जोमदार होईल हे उद्दिष्ट्य ठेऊन एकमेकांना मदत केली. आप्तांची भरपूर पैदास झाली.
सेगब्रश झुडुपांना इजा झाली तर शत्रूला विषारी असे उडनशील रसायन वातावरणात सोडते. ते स्वजातीय वनस्पती ओळखतात. त्यांच्यातही त्या रसायनाची निर्मिती होते. आपण ही रसायने जरी त्या जातीच्याच झाडांना लावली तर ती ही सजग होतात. या रसायनाची निर्मिती जास्त प्रभावीपणे सुरू करतात. यावर अभ्यास रिचर्ड कार्बान हा वनस्पती शास्त्रज्ञ कॅलिफोर्निया विद्यापीठात करत आहे. अँसॉबिडॉसिस प्रजातीचा झाडे जॉर्ज कासल या वैज्ञानिकाने शेजारी शेजारी लावली. आपल्या आप्तांना ज्या योगे जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळेल अशा रचनेत त्यांची पाने वाढली. परावर्तित प्रकाशाचा सुद्धा सगळ्या समूहाला जास्तीत जास्त फायदा होईल याचाही या वनस्पतींनी केला. त्याप्रमाणे वाढीची दिशा ठरवली, वाढ नियंत्रित केली.
सुर्यफुलांच्या झाडावर हेच प्रयोग केले गेले. एक चौरस मीटर मध्ये दाटी होईल इतपत १० ते १४ झाडे लावली. सर्व झाडे एकमेकांना पूरक वाढली. मुळे पण कोठेही एकमेकांवर कुरघोडी न करता वाढली. बिया ४७ टक्के जास्त आल्या. २०१७ साली हे जाहीर करण्यात आले.
भातांच्या मुळांमध्येच बाकी तणांना मारक अशी रसायने असतात. बिजिंग विद्यापीठात चुईहूआ काँग यांनी एकत्र भाताची रोपे लावली. सलग दोन वर्षे लावत गेले. त्यांना असे लक्षात आले की तिसऱ्या वर्षी या मारक रसायनांची मात्रा मोठ्या प्रमाणात वाढली होती. मिळणाऱ्या अन्नातील वाटेकरी कमी झाल्याने भाताचे उत्पन्न सुद्धा बऱ्यापैकी वाढले होते. हेच फर या झाडांच्या बाबतीत आढळून आले. जेथे एकत्र शेती, तेथे वाढ चांगली झाली होती.
Comments