मानव, प्राणी व पक्षी आपले आप्त-नातेवाईक ओळखतात कारण त्यांना मज्जा-संस्था असते. आपल्या निकटवर्ति आप्त, मित्र यांना सहाजिकच झुकते माप दिले जाते, त्यांची कामे प्राध्यानाने केली जातात. कॅनडामधील एका जीवशास्त्राज्ञाने सुमारे 12 वर्षांपूर्वी पहिल्यांदा कल्पना मांडली की वनस्पती आपले भाई-बंद ओळखत असतील का? जगण्यासाठी, जेथे आपले भक्ष्य स्वतः पकडून आपली भूक भागवायला लागते तेथे समूह जीवन वा कुटुंब-संस्था अस्तित्वात आली. जसजसा प्राणी उत्क्रांत होत गेला तसतशी बुद्धीत भर पडत गेली. आपली अपत्ये, भाई-बंद ज्यांची जनुके सारखी आहेत त्यांच्याकडचा ओढा वाढला. वनस्पती उत्क्रांत होतात का आणि होत असतील तर त्यांच्यात हेच बदल होत असतील का? संशोधकांना त्याचे होकारार्थी उत्तर मिळाले.
लौकिकार्थे वनस्पतींना मज्जा-संस्था नसते, जरी दिवस रात्र व वातावरणातले बदल कळत असले तरीही. पण संशोधन व निरीक्षणांती असे आढळून आले आहे की समाईक जनुके जेथे जेथे आहेत त्या ठिकाणी जास्त ओढ, आकर्षण आहे. जनुके समान असलेल्या वनस्पती समूहात लावल्या तर जास्त चांगल्या व एकमेकांचा विचार करून वाढतात. जास्त उत्पादन देतात.
सुसन डुडके यांनी झाडांच्या उत्क्रांतीवर संशोधन केले आहे. कॅनडामधील हॅमिल्टन येथील मॅक मास्टर युनिव्हर्सिटीत त्या संशोधन करतात. त्यांचे निष्कर्ष असे आहेत की ज्या वनस्पतींची जनुके सारखी आहेत त्या समूहात लावल्या तर वाढताना एकमेकांना प्राधान्य देऊन वाढतात.एकमेकांना मारक होणार नाहीत अशा प्रकारे मुळे पसरवतात, सगळ्यांना प्रत्यक्ष व परावर्तीत सूर्यप्रकाश मिळेल आशा प्रकारे पाने फांद्या पसरवतात. तेथे भाऊबंदकी नसून भाई-चारा असतो. अगदी वाळवी पासून ते माणसांपर्यंत सगळ्यांना आपले कोण हे कळते.
नॉर्थ अमेरिकेत सायकोरेट, एक निवडुंगवर्गीय वनस्पती घेऊन काही प्रयोग केले गेले. याची रोपे एकत्र, वेगळी, तसेच इतर वनस्पतींबरोबर लावली. जेथे स्वजातीयांबरोबर लावली तेथे पान, मूळ यांची वाढ एकमेकांना पूरक झाली, सगळ्यांना अन्न, पाणी, सूर्यप्रकाश सारखा मिळेल आशा रीतीने, त्रयस्थ वनस्पती बरोबर मात्र फक्त आपलाच विचार करत वाढली.
थायलंड मध्ये ऊती संवर्धनाद्वारे तयार केलेली ऑर्किडची छोटी रोपटी हवा बंद बाटली मध्ये मिळतात. ती नीट वाढावीत यासाठी वेगळी लावली, बहुतेक सर्वच मेली, जी एकत्र ठेवून वाढवली ती चांगली वाढली.
आपण जंगलात सुद्धा सजातीय वृक्ष समूहात बघतो. जंगलांचे पुनरर्निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला जातो आहे, या सर्व गोष्टी विचारात घेऊन, तज्ज्ञांच्या सल्ल्याने हे प्रयत्न केले जावेत अशी अपेक्षा.
Comentários