top of page

नकोशी झालेली सुटका.

Dr. Prakash Joglekar

जंगलबुक सिनेमा आपल्यापैकी बर्‍याच लोकांनी पाहिला आहे. भले ही गोष्ट काल्पनिक असेल, पण खरंच असे घडणे शक्य आहे का? कारण कल्पनाविस्तार करण्यास छोटी का होईना पण कथा लागते.

हे असं घडत असत! या गोष्टीची सुरुवात १९६५ साली मार्कोस रॉड्रिक पेंतोजा या स्पेनमधील मुलाच्या बाबतीत घडली. फार लहानपणी आईचा मृत्यू झाला, सहा-सात वर्षांचा असताना पैशाच्या आमिषाने बापाने एक वृद्ध माणसाला विकला. थोड्या दिवसांतच त्या वृद्ध माणसाचा मृत्यू झाला.एखाद्या कापडाचा वा कागदाच्या तुकड्याचा

भाग कापून फेकतात तसाच बापाने याला कुटुंबातून बाहेर काढला होता. त्या लहानग्याने आपल्या गावाचा, समाजाचा त्याग केला व सिएरा मोरेना पर्वतराजीत राहावयास गेला. त्यानंतर बारा वर्षांनी तो एका लांडग्यांचे वास्तव्य असलेल्या गुहेत सापडला.

या ७ वर्षाच्या लहानग्याला उदरभरणासाठी बरेच कष्ट करावे लागले. मिळेल त्या साधनांचा उपयोग करून, फासे सापळे बनवून ससे, लावी पक्षी पकडून त्यावर जगण्यास शिकला. इतर जंगली प्राण्यांचे निरीक्षण करून खाद्य कसे मिळवायचे हे शिकला. अस्वलांचे घ्राणेंद्रिय तिक्ष्ण असतात. जमिनीचा वास घेऊन तेथील खाण्यायोग्य कंदमुळे उकरून काढून खातात, हे लक्षात आल्यावर अस्वलांनी कंदमुळे उकरली की त्यांना दगड मारून हाकलून देण्यास व त्यांचे खाद्य पळवण्यास यशस्वी झाला. कोणतेही कपडे नसताना थंडी वाऱ्यात राहण्यास सक्षम बनला.

हे उद्योग करत असताना त्याला डोंगरात गुहा सापडली. त्याच गुहेत तो बारा वर्षांनी इतरांना सापडला.हा चिमुरडा ७/८ वर्षांचा असताना जेव्हा गुहेत गेला तेव्हा तेथे ८/९ लांडग्यांची पिल्ले होती. त्यांच्याशी खेळता-खेळता झोप लागली. थोड्यावेळाने पिल्लांची आई आली, या लहानग्या मार्कोसला हुसकले. त्याचा पाठलाग करून बराच वेळा पिटाळले, पण हा लहानगा परत परत येत होता. तिला त्याची अगतिकता उमजली असावी. तिचे मातृप्रेम जागे झाले, तिने त्याला स्वीकारले, आपल्या बाळांकरता आणलेल्या शिकारीतला हिस्सापण त्याला देऊ केला.या लांडग्यांच्या कळपाचा तो अविभाज्य घटक म्हणून सामावून गेला!

बारा वर्षे झाली, काही गिर्यारोहक तेथे गेले असता त्यांना तो मार्कोस सापडला. विवस्त्र, केस वाढलेले, हातापायाची नखे वाढलेली, अर्थात मोठी नखे ही त्याची गरज होती. त्या प्राणी जगताचा अविभाज्य भाग बनून तो राहत होता, अगदी रानटी बकऱ्यांचे दूध काढून पिण्याइतका उत्क्रांत झाला होता. इतर खाद्यात सापासकट मिळतील ते छोटे प्राणी पक्षी, धर्माच्या आईने दिलेला शिकारीचा वाटा होताच. २०१३ साली बी.बी.सी. ला त्याने ही माहिती सांगितली.

गिर्यारोहकांनी काहीशा जबरदस्तीनेच त्याला सुसंस्कृत जगात नेले, त्याला मानवी भाषा परत शिकवली. तोपर्यंत तो आपली मूळ भाषा विसरून लांडग्यांच्या भाषेतच बोलत असे. त्याला आपले रिवाज, खाणेपिणे शिकवण्यास सुरुवात केली. जनावरांसारखेच पाण्यात तोंड घालून पाणी पीत असे. तो १९ वर्षांचा ज्यावेळी होता त्यावेळी त्याला प्रथमच वाडग्यात गरम सूप दिले त्याच्या पद्धतीने त्याने एकदम आपले हात घातले. सूप उकळते अंगावर सांडले. हात,. अंग पोळले, अंगावर फोड आले त्याच्या दृष्टीने ही क्रिया नैसर्गिकच नव्हती का?

खऱ्या अर्थाने अशी अनेक "सूप दिव्य" पार पाडून जो मानव समुदायाचा भाग बनू शकला, E1-Pais या स्पॅनिश वर्तमानपत्राला त्याने मुलाखतीत स्पष्टच सांगितले की हे मानव जगतात निराशेचाच भाग जास्त आहे. या पर्यावरणवादी संघटनेने त्याची व्याख्याने आयोजित केली होती, तेथेही तो हेच सांगत असे की तो प्राणीजगतात खऱ्या अर्थाने खुषीत होता, अन्न मिळवण्याशिवाय काही ही त्रास नव्हता.


7 views0 comments

Recent Posts

See All

Comments


Post: Blog2 Post
bottom of page