जन्म मृत्यूचे चक्र चालू असते. आपणापैकी कोणाच्या आप्ताचा मृत्यू झाला तर दुःख कस असतं याची जाणीव होते. असेच प्राण्यांमध्ये होत असेल का? जेथे जेथे कुटुंब संस्था आहे तेथे सुख-दुःखाचे चक्र असणारच! आपण अॅनिमल प्लॅनेट वरचे कार्यक्रम बघतो. तेही भक्षक आपले भक्ष्य कसे पकडतात,मारतात ते बघतो. कळपातील इतर जनावरांची प्रतिक्रिया बघतो भक्षक जेव्हा चाल करून येतो किंवा त्या पवित्र्यात असतो तेव्हा हे प्राणी एकमेकांना सावध करण्याचा प्रयत्न करीत असतात. माकडे झाडांवरून चित्कारतात, तर हरिणवर्गीय प्राणी खूर आपटून आपल्या बांधवांना सावध करतात. पण एकदा का भक्षस्थानी आपला बांधव पडला असे लक्षात आले की काही क्षणात सर्व पूर्ववत होते. नित्याचे व्यवहार चालू होतात. एखादी लेकुरवाळी मारली गेली तर त्या पिल्लाचा सांभाळ दुसरी दूध आई करते. स्वत:चे संरक्षण करून उदरभरण करणे, प्रजोत्पादन करणे ह्या व्यापात दुःखात जास्त वेळ घालवणे वा त्याचे प्रदर्शन करणे अशा गोष्टीत अडकणे शक्यच नसते. एकच बाजू जमेची, भक्षक फक्त भुकेच्या वेळी हत्या करतो. एक खेळ वा सुपारी घेतली म्हणून नाही!
प्राण्यांना दु:ख होत असेल का? आपला पालनकर्ता मृत झाल्यावर पाळीव कुत्री २-३ दिवस उदास राहतात, उपास करतात. हे अनुभवले आहे. रामायणाची सुरुवातच क्रौंच वधामुळे झाली. सारस व शिंगचोचे पक्षी हे जन्माचे साथी असतात. शेळ्या विश्रांतीच्या वेळी एकमेकीना पाठ टेकून झोपतात व दोन विशिष्ठ शेळ्याच एकमेकींच्या सहवासात राहतात, पण पालनकर्ता कोणताही विचार न करता त्या कळपातील काही पशू विकतात. त्या पशूची मनःस्थिती काय होत असेल? आपले मेलेले पिल्लू सुद्धा माकडीण ३-४ दिवस घेऊन फिरत असते. त्याला दूध पाजायचा प्रयत्न करते. पिल्लांना जोवर परावलंबित्व आहे तोवर त्याची सर्वतोपरी काळजी जन्मदाते घेतात व बहुदा त्यामुळेच कुटुंब संस्था, सहजीवन अस्तित्वात आले. त्यातूनच वेगवेगळ्या नात्यांची गुंफण होत गेली.
आपल्या पिल्लांची काळजी घेताना पशुपक्षी आक्रमक होतात हे आपण अनुभवले असेल, पण पिल्ले मोठी होतात तशी नाती पूर्ण बदलतात. किंबहुना त्यांना दूरच जावे लागते. पिल्लांची काळजी घेण्याचा वेगळा प्रकार - किंग कोब्रा इतर सापांवर जगतो. जेव्हा मादी अंडी घालते ती एक घरटे करून व नंतर अंड्यांच्या संरक्षणाकरता तेथेच थांबते. पिल्ले अंड्यातून बाहेर
येण्याच्या वेळी मात्र घरटे सोडून दूर जाते. आपणच आपली पिल्ले खाऊ या भितीने ही राखण करत असताना तिची स्वतःची आबाळच झालेली असते.
प्राण्यांच्या भावना, सुख-दुःख यावर पाश़्चात्य देशात खूप अभ्यास, संशोधन झाले आहे, होत आहे. खरं म्हणजे या गोष्टीसुद्धा निसर्ग वाचनातच मोडतात. वियोगाचे दुःख जेवढे माणसास होते तेवढे पशुपक्षांनाही होते ते दिखाऊ कधीच नसते.
कावळ्यांची शोकसभा आपण पाहिली असेलच मृत कावळ्याभोवती त्याचे भाईबंद जमतात. अंत्यदर्शन विधीच तो. अमेरिकेतील ब्लू पक्षी मेला तर त्याच्याभोवतीही त्याचे बांधव जमतात. यावर युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया डोरोस येथे संशोधन चालू आहे.
सस्तन प्राण्यांमध्ये या सर्व गोष्टी प्रामुख्याने दिसून येतात. केनियामधील सोयसाम्बू अभयारण्यात दीड महिन्याचे जिराफाचे पिल्लू मृत झाले. त्या सोबत सर्व धोके पत्करुन त्याची आई चार दिवस बसून होती. त्याच अभयारण्यात जन्मजात विकृती असलेले पिल्लू जन्माला आले. उभे राहू शकत नव्हते. भक्षक तर सभोवती होतेच. पिल्लाला उभे करण्याचा प्रयत्न बराच वेळ केला. हे जगण्यास , स्वतःचे भरवशावर असमर्थ आहे हे पाहिल्यावर त्याची आई सोडून गेली. याच अभयारण्यातील पाळीव हत्तीण मृत झाली. तिला पुरण्यात आले. पुढील काही दिवसांत तेथील पाच वेगवेगळ्या कळपांमधील हत्ती त्या जागेस भेट देऊन गेले. हत्ती आपल्या बांधवांची हाडे ओळखतात. एका हत्तीणीने मृत पिल्लास जन्म दिला. तिच्या प्रत्येक अवयवातून शोक व्यक्त होत होता.
कोलेरॅडोतील एका कुटुंबाने अलास्काला स्थलांतर केले. जाताना आपले पाळीव लामा ब्रेगेडिअर व ब्रुनी यांना घेऊन गेले. काही काळाने ब्रुनीचा मृत्यू झाला. वयाने ती मोठी होती. ब्रेगेडिअरने अन्न पाण्याचा त्याग केला. अखेर त्यालाही तेथेच चिरविश्रांती देण्यात आली. लगोलग नवीन लामांची जोडी आणली गेली. पुढील कित्येक दिवस नवी जोडी ज्या ठिकाणी लामाला पुरले गेले होते तिथे भेट देत होती. अशाच एका लांडग्याच्या कळपातील मादी माउंटन लायने मारली. पुढील कित्येक दिवस या कळपातील जानच गेल्याचे लक्षात आले. कित्येक दिवस खेळकरपणा पूर्ण संपला होता. प्रख्यात प्राणी संशोधक जेन गुडाल हिने अनुभवलेली गोष्ट. फ्लिंट नावाच्या चिंम्पाझीची. आई मृत पावली, इतर लेकुरवाळ्या त्याची काळजी घेण्यास तयार होत्या. पण त्याने पूर्णपणे अन्न पाण्याचा त्याग केला. आपल्या रिकाम्या घरट्यात एकटाच उदास बसून असे. या प्रकारे प्रायोपवेशन करून प्राणत्याग केला.
सुमारे २० वर्षांपूर्वी हैद्राबादच्या प्राणीसंग्रहालयातील घटना. सर्व वर्तमान पत्रामध्ये याला प्रसिद्धी दिली होती. शेजार शेजारच्या पिंजऱ्यात दोन वाघ होते. एका रात्री काही जणांनी एक वाघ दुसऱ्याच्या देखतच पिंजऱ्यात मारला. सोलला,त्याचे धड तेथेच टाकून कातडे घेऊन गेले. दुसऱ्या वाघाला याचा प्रचंड धक्का बसला. भेदरून पिंजऱ्यात एका बाजूला बसून होता. खाणे पिणे सोडले. पुढील काही दिवस त्याला सलाईन लावावे लागले. अर्थात येथेही गुन्हेगारांचा शोध लागला नाहीच.
आपल्याकडे सुद्धा कत्तलखान्यात जनावरांना एकमेकांसमोर मारू नये असा नियम आहे. येथे हा नियम माणसांच्या बाबतीतही पाळला जात नाही, उलट वचक बसावा यासाठी खुलेआम कत्तल केली जाते.
संदर्भ- How the animals grieve by Babara king.
Comments