top of page

यलो स्टोन पार्क विषयी -

Dr. Prakash Joglekar

उत्तर अमेरिकेतील यलो स्टोन नॅशनल पार्क काही हजार चौरसमैल क्षेत्रफळ असलेला, निसर्ग विविध रूपात आपल्याला दाखवणारा, सर्व पर्यटनाच्या सुखसोई असलेला असा खऱ्या अर्थाने सुंदर असा भाग आहे. हरणे, अस्वले, वाईल्ड बिस्ट, ससे, लांडगे, कोल्हे यासारखे प्राणी, शिकारी व इतर पक्षी, भरपूर तळी, पाणपक्षी, विविध तऱ्हेचे मासे असा समृद्ध पार्क आहे. त्यातील मुख्य गोष्ट म्हणजे तेथील "गीझर्स" ठराविक वेळाने उसळणारे गरम पाण्याचे प्रचंड फवारे उडतात. तेथील पाण्यात गंधकाचे प्रमाण जास्त असल्याने ज्या दगडांवर हे पाणी वाहते ते पिवळे दिसतात. सुंदर वनराई, नद्या, धबधबे - काही नाही असे नाही. प्रवेशासाठी भक्कम रक्कम मोजावी लागते.


हे सर्व लिहिण्याचे कारण वेगळेच आहे. निसर्गातील मानवी हस्तक्षेप साधारणपणे विनाशासच कारण ठरतो. येथे मात्र वेगळे घडले आहे. १९९५ साली तेथे बाहेरून आणून सोडलेल्या आठ लांडग्यांच्या जोड्या. परत थोडे विषयांतर.

वैश़्विक तापमानवाढीवरचा एक उपाय सांगितला जातो तो शाकाहाराचा - दुसरा गट सांगतो की मांसाहार सोडला तर आपणास अन्नधान्य पुरणार नाही. आपण तृणहारी जनावरे खाद्य म्हणून वापरतो, त्यासाठी मोठे चराऊ कुरणे राखावी लागतात, पाणी पण फार लागते. गवत गेल्याने जमिनीची धूप होते, पाणी मुरत नाही. तसेच या प्राण्यांच्या ढेकरेवाटे, पादावाटे मिथेन गॅस वातावरणात मिसळतो जो कार्बन डायऑक्‍साईडच्या २५ पट जास्त उष्णता शोषतो.


१९९५ पूर्वी येलो स्टोन नॅशनल पार्कमध्ये हरणांची संख्या खूप वाढली होती. तेथे त्यांना कोणताही शत्रू नव्हता, निसर्गाचा ऱ्हास सुरू होता. अमेरिकेत हरणे सगळीकडे आहेत, अगदी शहराच्या आजूबाजूला, रस्त्यांवर सुद्धा आहेत. आकार एखाद्या वासरा येवढा, की ज्यांचा उपद्रव होतो, अपघात होतात. तेथे परवाना घेऊन शिकारीची परवानगी मिळते. दरवर्षी रस्त्यावरील अपघातात व शिकारी द्वारे १० लाख हरणे अमेरिकेत मरतात, मारली जातात नैसर्गिक कारणांमुळे होणारे मृत्यू वेगळेच.


येलो स्टोन पार्कमध्ये या चरण्यामुळे अनेक प्रदेश उजाड बनावयास लागले होते, इतर प्रजाती धोक्‍यात येऊ लागल्या होत्या, कारण त्यांना लागणारे खाद्य, निवारा नाहीसा होत होता. बऱ्याच विचारांनी तेथे हरणांची संख्या नियंत्रित करण्यासाठी लांडग्यांच्या आठ जोड्या १९९५ साली सोडण्यात आल्या. खाद्य भरपूर व सहज उपलब्ध, लांडग्यांची संख्या वाढून पुढील थोड्याच काळात हरणांच्या संख्येवर नियंत्रण येऊ लागले आणि जादू झाल्यासारखे संपूर्ण परिसराचे स्वरूपच बदलू लागले. सर्वत्र गवत वाढू लागले, जमिनीची होणारी धूप थांबली, धूप थांबल्यामुळे नदीचे प्रवाह जे बदलत असतात त्याला निश्चित रूप आले. स्वच्छ पाण्याने भरून नद्या वाहू लागल्या. पाण्यातील जलचरांची संख्या वाढू लागली. बीव्हर हा प्राणी झाडांच्या मोठ्या फांद्या तोडून पाणी अडवतो, थोडक्यात छोटी छोटी धरणे बांधतो, त्या खालून आपले बीळ खोदून वंशवृद्धी करतो, त्यांची संख्या वाढू लागली. त्या धरणांच्या परिसरात ओटर - पाणमांजराची संख्या वाढू लागली. खाद्याची उपलब्ध वाढल्यामुळे पाणपक्षी पण मोठ्या संख्येने येऊ लागले.


गवताबरोबर इतर झाडांचा नाश हरणांद्वारे होत होता, आता ती वाढायला लागली. त्यावर येणार्‍या फळांची, बेरींची उपलब्धता खूप वाढली, त्यावर नवनवे पक्षी येऊ लागले, काळ्या‌ व राखाडी अस्वलांना पण भरपूर खाद्य मिळून त्यांची संख्या वाढली. जमीन उजाड नसल्याने तेथे ससे, उंदीर पण वाढले. त्यामुळे शिकारी पक्ष्यांना पण आमंत्रण मिळू लागले, थोडक्यात निसर्गाच्या प्रत्येक घटकाची समृद्धी वाढली!


विचारपूर्वक व शास्त्रीय पद्धतीने केलेला, फक्त मानव केंद्रित नसलेला निसर्गातील मानवाचा हस्तक्षेप काय घडवू शकतो ह्याचे हे उत्तम उदाहरण. आपण मात्र विकासासाठी म्हणून जे जे करतो ते अखेर विनाशाकडे आपणास नेते.


1 view0 comments

Recent Posts

See All

Comentários


Post: Blog2 Post
bottom of page