ज्ञानदेवीने म्हटले आहे की, वृक्षहत्या ही सर्वात वाईट ,कारण वृक्ष हे स्थावर असतात. ते स्वतःचे रक्षण करू शकत नाहीत. खरे तर मानव वृक्षांवर कुऱ्हाड चालवतो, एवढे सोडले तर वास्तवात वनस्पती स्वतःची काळजी नक्कीच घेत असतात. वृक्षांना, वनस्पतींनाही संवेदना असतात हे जगदीशचंद्र बोस यांनी अनेक प्रयोगाअंती शंभर वर्षांपूर्वीच सिद्ध केले आहे. एवढेच नाही, तर प्रतिकूल परिस्थितीत आपला बचाव कसा करावयाचा ,येणाऱ्या संकटांना कसे तोंड द्यायचे हे त्यांना माहीत असते. वृक्ष, वनस्पती आपल्या इतर बांधवांनाही वेळप्रसंगी मदत करतात, विद्युत लहरींद्वारे वा रसायनांद्वारे संदेश पाठवतात.
स्वसंरक्षणाची सुरुवात त्यांच्या रचनेपासून होते, त्याचप्रमाणे अंगी असलेल्या रसायनांमुळेसुद्धा. निसर्गातील इतर सजीवांचीही त्यांना मदत होत असते. बाभळी- निवडुंगांना काटे असतात. काहींचे तर सहा इंच लांब. भक्कम... बाभळीच्या काही प्रजातींच्या काट्यांजवळ एक प्रकारचा गोड स्त्राव तयार होतो. तेथे मुंग्या आकर्षित होतात. रक्षणाला मदत करतात. रूई सारख्या वनस्पतींच्या पानावर मेणासारखा थर असतो. काहींच्या पानावर लव असते. मानवी त्वचेच्या संपर्कात येताच ती टोचते, त्वचेला खाज सुटते, तर काही वनस्पती लवेद्वारे रासायनिक पदार्थ टोचतात! काही विशिष्ट वनस्पतींच्या पानाची अळी सुरुवातीला काही चावे घेते; पण लवकरच त्या पानांच्या भोवतालच्या पेशी मृत होतात. अळीची फसगत होऊन पान वाचते. फिलिपाईन्समधील एक कॉफीवर्गीय वनस्पती साधारण १० ते १५ इंच उंच असते. खोडाला गुहेप्रमाणे छिद्र असते. तेथे मुंग्या संसार थाटतात. झाडाची रखवाली करतात. केवडा घायपातीसारख्या झाडांच्या पातीला धार असते. तर टोक एखाद्या खिळ्याप्रमाणे असते. काहींच्या फांद्या खडबडीत असतात, तर लाजाळूचे झाड पान मिटून घेते.काही नेच्यांच्या फांद्या संकटसमयी मृतवत होतात. जमिनीलगत जातात, नंतर नेहमीप्रमाणे डोलतात. काही फुलांभोवती काटे असतात. उदा, पिवळा धोत्रा. कोरफड, कडुनिंबसारख्या झाडांची चव अतिशय कडू असते.
अनेक औषधी वनस्पतींची ओळख आपल्याला असते. प्रत्येक वनस्पतीतील सर्व भागांत रासायनिक संयुगे असतात व ती त्यांच्या स्वसंरक्षणासाठी तयार केलेली असतात. भले ती इतर प्राणीमात्रांकरिता औषधी वा विषारी असतील. कान्हेरीसारखी पाने अतिविषारी असतात.रुई, देवचाफा, पॉईनमेटिया यांचा चीक विषारी असतो. ऑर्किडच्या काही प्रजातीतील पानात विशिष्ट पेशी असतात. त्यातील रसायने कीटकाच्या तोंडातील रसायनांच्या संपर्कात आल्यावर विष बनते. तंबाखूच्या पानांवर अळीचा प्रादुर्भाव झाल्यावर त्यातील निकोटिन ची मात्रा वाढायला लागते. कीटकांच्या हालचाली मंदावतात आणि त्याचा वास इतर कीटक भक्षींना आमंत्रित करतो. फॉक्स ग्लोवा या वनस्पतींपासून रक्तदाबावर औषध बनते,पण त्याचे पराग अतिविषारी असतात. त्याचप्रमाणे ऱ्होडोडेनड्रॉईनचे परागही अतिविषारी असतात. अँथुरियम, अनेक प्रकारच्या लीली, औसिलिया, कान्हेर, देवचाफा यांसारखी फुले अतिविषारी असतात. हायड्रेजिया, हायसीन्स, लिलीच्या काही प्रजातीत चक्क हायड्रोरासायनिक अॅसीड असते. अगदी बांबूच्या नवीन फुटव्यातसुद्धा ! धोत्र्याच्या फुलात स्ट्रिकजीनमधे सुद्धा विष असते.काहींचा गंध त्यांचा बचाव करतो. बिया,फळे, कंदवर्गीय वनस्पतींना येणारे कोंब हे नवनिर्माणासाठी असतात,त्याचा बचाव होणे महत्त्वाचे. बटाट्याचे कोंब विशेषतः कोंबाखालचा हिरवा भाग अति विषारी असतो. टणटणीची हिरवी फळे, मॅनग्रोव्हची फळे अति विषारी असतात. जर्दाळू , चेरी यांच्या देठाच्या विरुद्ध भागात एक खळगा असतो तेथे 'एचसीएन' तयार होते. कडू काकडी, भोपळयातही ! सफरचंद, जर्दाळू च्या बिया अखंड पोटात गेल्या तर कही अपाय नही पण चुरा गेल्यास कठीण परिस्थिती उद्भवू शकते. त्यातही 'एचसीएन' असते. तसेच गुंज अखंड गिळली तर ठिक, पण तडकलेली असेल किंवा तिचा चुरा खाल्ला तर मोठी माणसे मरु शकतो. एरंडाच्या बीचेही हेच गुण आहेत. आपण घरात हौसेने झाडे लावतो. तत्पूर्वी कोणती लावायची ह्याचा विचार व्हावा. जाता-येता सहज फांद्या तोडल्या, पाने चुरगाळली असे करु नये. कोणाच्यातरी सांगण्यावरुन औषध म्हणूनही घेऊ नये. हे सर्व वैयक्तिक बचावासाठी पण यात वनस्पतींनी समुदायाचाही विचार केला अहे. येथे 'समाजा'ही' विचार झाला अहे. येथे रासायनिक या विद्युत लहरींद्वारे संदेश पाठवले जातात. एखाद्या मोठ्या झाडावर मोठ्या प्रमाणात कीटकांचा प्रादुर्भाव झाला, तर ते त्या झाडातून काही रसायने वातावरणात सोडली जातात. ज्यांचा वास सरडे, पक्षी, किटकभक्ष गांधील माश्यांना आकर्षित करतो. इयान बाल्डविन या शास्त्रज्ञाने या वर बरेच संशोधन केले आहे.
नॅशनल जीओग्राफिक मध्ये प्रसिद्ध झालेला एक लेख वैशिष्ट्यपूर्ण होता.जंगलात किती जिराफ हे जंगल ठरवते. स्वतःच अस्तित्व टिकवायचे असते. जर जिराफ वाढले तर पानात जास्त टॅनिन तयार होते, ते जिराफांची संख्या मर्यादित करते. तेथे कृत्रिम रेतनाद्वारे वाढवायचा प्रयत्न झाला. तो अयशस्वी ठरला, पण वाढविलेले जिराफ दुसऱ्या जंगलात सोडले, ते जगले. गुरे चरताना एका ठिकाणी गवत खाल्लं तर काही अंतर सोडून पुढे जातात व गवत खातात. त्या अंतरापर्यंत रासायनिक संदेश जातो व जास्त प्रमाणात टॅनिन स्त्रवते, ते जनावरांना कळते!
सुझानी सायमंड या कँनडामधील शास्त्रज्ञांने डग्लस फिर फॉरेस्ट येथे संशोधन केले आहे जमिनीखाली हे झाडाच्या मुळांचे एक प्रकाराचे संवेदनावाहक जाळे पसरलेले असते ज्यामध्ये बरेच ज्ञान साठवलेले असते - हिडन इंटेलिजन्स. झाडांच्या मुळाभोवती बुरशीचे जाळे असते. तिच्या वाढीसाठी झाड शर्करा पुरवते जे सूर्यप्रकाशाच्या मदतीने पानात तयार झालेले असते. झाडास मूलद्रव्यांचे शोषण सोपे व्हावे यासाठी बुरशी त्यांचे विघटन करते. ज्या झाडांना जास्त सूर्यप्रकाश मिळतो त्यांच्यात अतिरिक्त शर्करा तयार होतो आणि चक्क हे मोठा बांधव आपल्या छोट्यांना अन्नपुरवठा करतात. एवढेच नाही, तर वसंतऋतूपासून पानगळ होईपर्यंत पाईन वृक्ष आपले शर्करा भूर्जापत्र वृक्षांना देते. त्यांची वाढ चांगली होते. अतिथंड वातावरणात ती भूर्जापत्राची झाडे परत वाढतात. अशा समूहातील काही वृक्ष जर आपण काढले, तर संपूर्ण समूहच धोक्यात येऊ शकतो. कारण आपण त्यांची संदेशवहन योजना निकामी करतो. फरच्या मोठ्या वृक्षाला खोडकिडा लागला, तर तो इतर बांधवांना या माध्यमातून संदेश पाठवतो. ते आपली "कातडी" अधिक मजबूत करतात. बुर्शिबरोबरच्या नात्याला मयकोरिझे असे संबोधले जाते. एकाप्रकारे या सर्व यांत्रणांद्वारे झाडे एकमेकांशी बोलतच असतात. क्रिसोग्राफ या तंत्राद्वारे झाडांतील लहरींचा अभ्यास करता येतो. प्रतिकूल परिस्थितीत काय घडते याचा अभ्यस करता येतो . झाडांतील बदलांचे निरीक्षण करून वातावरणात होणाऱ्या बदलांचा अभ्यास करू शकतो, निष्कर्ष मांडू शकतो. वातावरणातील ग्रीन हाऊस गॅसेसचा वनस्पतींवर होणारा परिणाम यावर बरेच संशोधन सुरू आहे.
Comments