top of page

वरदान ठरलेले अपघात

Dr. Prakash Joglekar

आदिमानवाला वनस्पतींची दोन मुख्य कारणांकरता गरज भासली. उदरभरण व प्रकृती. व्याधी तर होत होत्याच आणि जिवंत राहण्याकरता हट्टेकट्टे असणेही महत्त्वाचे होते. मग निरीक्षणातून, प्रयोगातून वनस्पतीजन्य औषधी शोधली असणार. जनावरे कीटक यांपासून संरक्षणासाठी, वनस्पतींनी रसायने स्वत:त निर्माण केली. ज्या योगे हे शत्रू दूर राहतील. त्यांचा उपयोग मानवाने करून घेतला असणार, प्रथम सुवासिक वनस्पतींवर त्याचे लक्ष गेले.


आयुर्वेद हा वेदांचाच एक भाग. वेगवेगळ्या वनस्पती, मूलद्रव्ये उपचारात हजारो वर्षांपासून वापरात असणार,

इजिप्तमध्ये ख्रिस्तपूर्व १५५० वर्षांपूर्वी एबर्स पायरस यांनी ८५० औषधी वनस्पतींचे वर्णन लिहून ठेवले आहे. डिस्कोरिडेस या ग्रीक फिजिशियनने ६०० वनस्पतींपासून बनवलेल्या १००० मिश्रणाचे उपयोग लिहून ठेवले आहेत. तो ग्रीसच्या सेनादलात काम करीत असे.


प्राणीसुद्धा वनस्पतींचा खाद्याबरोबर व उपचारांसाठी उपयोग करतात. पोटाच्या विकारात कुत्री मांजरे गवत खाऊन ओकतात हे आपण पाहतोच. बहाव्याच्या शेंगेतील गर माकडे सारक म्हणून वापरतात. ते पाहून त्याचा उपयोग आपल्या चिकित्सेत केला आहे. अशाच वेगवेगळ्या निरीक्षणांमधून काहींचा उपचारात प्रायोगिक वापर करून वनस्पतींचे औषधी उपयोग आपण जाणून घेतले. काहींची माहिती अपघातानी, अचानक मिळाली. आपण त्याचा विचार करणार आहोत.


आपल्या नेहमीच्या वापरातले अॅस्पिरीनच घ्या. रासायनिक दृष्टीने ते अॅसिटाल सॅलिसिलिक आम्ल आहे. दमलेली, गाड्या ओढणारी कुत्री व्हाइट विलो झाडाचे खोड चाटून ताजीतवानी होत असल्याचे लक्षात आल्यावर त्यातील रसायनांचा शोध घेतला. ते निघाले सॅलिसिलिक अॅसिड.


साऊथ आफ्रिकेतील दक्षिण वाळवंटात खाण्याची वानवा होती. तेथे कामानिमित्त जाणारे लोक अशीच एक वनस्पती चघळत. ज्याने त्यांची भूक मरत असे. ती वनस्पती होती रुईसारखा चिक असणारी हूडिआ. त्यावर अभ्यास करून १९९७ पासून फायझर हीकानो वजन कमी करण्यासाठी उपयोगी औषध बनवत आहे. सुपारीची खांडे चघळत राहण्यानेही भूक कमी होते, असे निरीक्षणात आले आहे.


कावळी (Gymnema sylvestre ) - या वेलवर्गीय वनस्पतीची हिरवीगार अंडाकृती पाने असतात, तिच्या खोडावर लव दिसते. महाबळेश्वर, कोकणातील काही भाग, दोडामार्ग येथे ती सापडते. तेथील मूळ रहिवासी भूक लागल्यावर ही पाने खात असत, पोट भरत असे. याचा अर्थ त्यांची भूक भागत असे. ती कृमींवरही काम करत होती. तिचे पृथ:क्करण केल्यावर जिम्नमिक अाम्ल हे रसायन सापडले. नंतर असे लक्षात आले की या वनस्पतीच्या सेवनाने मधुमेह आटोक्यात येतो. या गुणधर्मामुळे तिला 'मधुनाशिका' हे नाव पडले.


स्थानिक भूलेसाठी कोकेन वापरत, तर थकवा घालवण्यासाठी कोकेनची पाने चघळत असत . त्यावेळी तोंड बधिर होते असे लक्षात आले. अर्थात याचा उपयोग उपचारांमध्ये करता येईल का याचा विचार सुरू झाला. कोल्लर या नेत्रतज्ज्ञाने सप्टेंबर १८८४ मध्ये याचा प्रयोग व्हिएन्ना येथील नेत्रतज्ज्ञांसमोर केला. बेडकाच्या डोळ्यात हे द्रव्य टाकले असता डोळ्यांच्या संवेदना नष्ट होतात व डोळ्यांवर शस्त्रक्रिया करणे शक्य होईल, असे दाखवून दिले.

अमेरिकेत गाई स्वीट क्लोव्हर या प्रकारच्या वनस्पती खाऊन त्या थोड्या बाधित झाल्या आणि अति रक्तस्त्रावाने मेल्या. त्या वनस्पतीतील द्रव्याचे विश्लेषण केले तेव्हा ते वॉर्फरिन (warferin) असे लक्षात आले. ते रक्ताची गुठळी होण्यास प्रबंध करत असे. प्रथम याचा उपयोग उंदीर मारण्यासाठी केला जात होता. एका नौसैनिकाने ते खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याला वाचवण्यात यश आले. त्यानंतर रक्त पातळ करणारे म्हणून हे मानवाच्या वापरात आले. व्हिस्काॅनसिन अल्युमनि रिसर्च फाऊंडेशन या संस्थेत हा अभ्यास झाला. त्यावरून हे औषध वॉर्फरिन या नावाने ओळखले जाऊ लागले.


मेडीक झाड (camel thorn plant)- वातावरणात उष्णता वाढते, तेव्हा या झाडातून गोडसर डिंकासारखे स्त्राव येतात. याला 'मन्ना' असे संबोधतात. इस्त्राईल मधील लोकांना रक्ती जुलाब होत होते. तेव्हा हे स्त्राव औषध म्हणून घेतले. त्याचा उपयोग झाला. अधिक संशोधनानंतर हे स्त्राव भूक कमी करतात असे लक्षात आल्यावर लठ्ठपणावर उपचारासाठी वापर सुरू झाला. बद्धकोष्ठतेवर सुद्धा याचा फायदा झाला.


अशी ही विज्ञान जगासाठी वरदान ठरलेल्या काही अपघातांची माहिती आपले कुतुहल नक्कीच वाढवते.


3 views0 comments

Recent Posts

See All

Comments


Post: Blog2 Post
bottom of page