top of page

हिमालय की गोद में-

Dr. Prakash Joglekar

सर्वसामान्यांच्या दृष्टीने हिमालय म्हणजे अनेक शिखरे असलेली, दगड-माती-बर्फ याने बनलेली पर्वतांची एक रांग - जगातील सर्वात उंच, ज्यावर प्राणी व वनस्पती अशी जीवसृष्टी आहे. हे पर्वत आपली उत्तरसीमा अधोरेखित करतात. एखाद्या कर्तृत्ववान माणसाच्या कार्याला हिमालयची उपमा देतात. प्रश्न पडत असेल की हिमालय केवळ आकाराने मोठा म्हणून का?- यापेक्षा वेगळी कारणे असली पाहिजेत असे वाटून त्याविषयी माहिती गोळा करून ती थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करत आहे. प्रथम सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जगाच्या एकूण लोकसंख्येतील ४०% लोकांची सुबत्ता, समृद्धी ही हिमालयामुळे आहे!

हिमालयात जगातील उंच अशी चौदा शिखरे आहेत, झीज होत असून सुद्धा दरवर्षी १० ते १२ मि. मि. ते वाढत आहे. हा पर्वत एकदम तयार झालेला नाही. समुद्रतळाच्या भूगर्भातील हालचालींमुळे टप्प्याटप्प्याने हा पर्वत तयार झाला. येथील मातीत समुद्रजीवांचे जीवाश्म सापडतात. त्यामुळे या अनुमानाला पृष्टी मिळते; भूगर्भातील मोठ्या प्रमाणात प्रथम ४२ ते ३३ दशलक्षवर्षांपूर्वी हालचाली होऊन भूपृष्ठाचा हा पट्टा जमिनीपासून उचलला गेला. नंतर १३ ते ९ दशलक्ष वर्षांपूर्वी व परत ६ ते ४ दशलक्ष वर्षांपूर्वी अशाच प्रक्रिया घडून या पर्वत रांगांना आजचे रूप आले, हळू हळू हवामानात बदल घडून आले आणि जीवसृष्टी बहरली- एक प्रकारे संपूर्ण पर्वत सजीव झाला!

हिमालयाच्या निर्मिती पूर्वी भारतवर्षात मोसमी पाऊस - मॉन्सून - असा नव्हता. तिबेटच्या पठाराचे उत्तर व दक्षिण असे भाग हिमालयामुळे झाले. उत्तर भाग हा अति थंड, तेथे आर्क्टिक टुंड्रा प्रदेशापासून अति शीत असे वारे येतात. उलट दक्षिणेकडचा - म्हणजे भारतवर्षाकडील भाग तापतो, त्यामुळे तेथे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो व थेट हिंद महासागरापासून येणाऱ्या मेघांना आकर्षित करतो - हिमालयाची उत्तुंग उंची हे मेघ अडवते - अर्थात येता येता हे मेघ संपूर्ण भारताला आपले पर्जन्यरूपी योगदान देऊनच येतात - मेघांचा हा प्रवास चक्क ४००० किलोमीटरचा असतो. मे ते ऑक्टोबरच्या दरम्यान तिबेट पठाराच्या उष्णतेच्या प्रमाणावर मॉन्सूनचे प्रमाण अवलंबून असते. सूक्ष्म फरक सुद्धा

निर्णायक ठरतात!

आपल्याला आश्चर्य वाटेल की अंटार्क्टिक प्रदेशातील बर्फाच्या प्रमाणावर सुद्धा मॉन्सून अवलंबून असतो. बर्फ वितळून कमी झाला तर बाष्पीभवनास जास्त जागा- जास्त बाष्प निर्मिती ,तसेच पाणी समुद्रात मिसळल्या मुळे समुद्रातील क्षारांचे प्रमाण कमी होऊन जास्त बाष्पीभवन होते. पाण्याच्या तापमानात फरक होऊन अंतर्गत प्रवाह निर्माण होऊन सर्वदूर पाणी प्रसरण होते. याचा मोठा परिणाम आपल्या हवामानावर होतो.(सांगण्यासारखी गोष्ट ही की आपल्या येथे पूर्वी एक विचार होता, नद्यांचे पाणी सर्व अडवायचे, समुद्रात जाऊ द्यायचे नाही. खारटपणा वाढला असता, बाष्पीभवन कमी होऊन पावसाचे प्रमाणही कमी झाले असते. जमिनीतील पोकळ्या मधून समुद्राचे पाणी आत घुसून प्रदेश नापीक झाला असता कच्छ मध्ये अशी प्रक्रिया घडल्याचे मानण्यात येते.)

सिंधू व ब्रह्मपुत्रा या विरूध्द दिशेला वाहणाऱ्या महानद्या हिमालयाच्या उत्पत्तीपूर्विपासून अस्तित्वात होत्या. हिमालयात अनेक सरोवरे आहेत उदाहरणार्थ मानस सरोवर. हा जो पाऊस पडतो तो अनेक नद्यां द्वारा संपूर्ण उत्तर व पूर्व भारतात हिमालय पोचवतो. या वाहिन्यांने अनेक जलमार्ग वाहतुकीस उपलब्ध झाले आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर हिमालय हे हृदयाचे काम करतो. पाणी एकत्र करून वाहीन्यांमार्फत सर्वदूर पोचवतो. हिमालयात सुमारे १५०० ग्लेशिअर्स आहेत. त्यातून नद्यांना पाण्याचा पुरवठा होतो. उगम पावणाऱ्या नद्या कोणत्या ते पाहू - ब्रह्मपुत्रा, गंगा, सिंधू, झेलम, बियास, राबी, सतलज,सरस्वती,अलकनंदा, रांगतेझ, रेड रिव्हर साल्वीन ,येलो रिव्हर, मेकोंग, झुन-जीआंग या खेरीज अनेक छोटया छोटया उपनद्या आहेत. या नद्यांमुळे उत्तरपूर्व भारत, पाकिस्तान, तिबेट,म्यानमार, नेपाळ, भूतान, थायलंड, लाओस बंबोडीया, चीनचा काही भाग यांची समृद्धी अवलंबून आहे. शेवटी हे पाणी समुद्रास मिळते, समुद्रातील पाण्याचा खारटपणा कमी करून बाष्पीभवन यास मदत करते. असे ऋतुचक्र चालूच राहते. या पाण्यातून मत्स्योत्पादन होतेच, शिवाय वेगवान प्रवाहांवर जलविद्युत जनरेटर बनवून वीज निर्मिती पण होते. या पाण्याबरोबर सुपीकता गाळ येऊन जमिनीचा कस वाढतो, सुंदरबन सारख्या ठिकाणी नवीन जमीन पण निर्माण झाली आहे. आत्तापर्यंत थोडाथोडा नाही तर पाच दशलक्ष क्युबिक किलोमीटर येवढा गाळ सोळाशे किलोमीटर पर्यंत वाहून नेऊन सर्वदूर पसरला आहे.

जगातील चाळीस टक्के लोकांचे जीवन यावर अवलंबून कसे आहे हे लक्षात येईल.

हिमालयात विपुल वनसंपदा आहे. औषधी वनस्पती तर अगणित आहेत. लाकूड उत्पादन तसेच मधासारखी पूरक उत्पादने, फळे विपुल प्रमाणात मिळतात. हा एक मोठा प्राणवायूचा कारखाना आहे.

हिमालय पर्वत अनेक खनिजांनी समृद्ध आहे. वेगवेगळी रत्ने सापडतात. कोळसा, ग्राफाईट, जिप्सम, मायका, लोह, जस्त, तांबे व सोने कमी जास्त प्रमाणात सापडते. सध्या काळजी वाटावी अश्या वेगाने चीन सोन्याकरता उत्खनन करत आहे.

तापमान वाढीचे एक कारण म्हणजे ग्रीन हाऊस गॅसेस, कार्बन डायऑक्साइड व मिथेन. मिथेन हे कार्बन डायऑक्साइडच्या २५ पट जास्त उष्णता धारण करतो. हिमालयात जेव्हा पाऊस पडतो तेव्हा कार्बन डायऑक्साइड बराच पाण्यात विरघळून सौम्य कारबोनिक अॅसिड तयार होते, ते सिलिकेट्स असलेल्या हिमालयातील दगडांवर पडते. कार्बोनेट संयुगे तयार होतात, पाण्यात विरघळतात. वातावरणातील कार्बन डायऑक्साइड अशाप्रकारे कामात आणून तापमान वाढीस काही प्रमाणात तरी अळा घातला जातो- विशेष म्हणजे ही कार्बोनेटची संयुगे वापरून समुद्रजीव आपली कवचे तर कोरल आपले फ्रेमवर्क तयार करते.

हिमालयाची महती एवढ्या थोडक्यात सांगून संपणार नाही.पण एक लक्षात येईल की हिमालय खऱ्या अर्थाने सजीव आहे, आपला जीवनदाता आहे, आपण त्यावर अत्याचार करून चालणार नाही.तसेच उपमान्य म्हणून वापरताना ती व्यक्ती तेवढ्याच तोलामोलाची आहे हे पारखून घेतली पाहिजे!


3 views0 comments

Recent Posts

See All

Comments


Post: Blog2 Post
bottom of page